29 Aug 2010

श्रीगणेशा..!!

श्रीगणेशा..!!


नमन करतो श्री गणेशा, वक्रतुंडा रे परेशा
लेखना प्रारंभ करतो, तरल शब्दा दे परेशा

शक्य करसी तू अशक्या, गम्यता देसी अगम्या
लक्ष अपराधास माझ्या, तूच पोटी घे परेशा

तू गजानन निर्विकल्पा, फेड माझ्या तू विकल्पा
वेल कवितेची चढू दे, वृक्ष तू व्हावे परेशा

तूच माझा सोयरा रे, पाठराखा तू सखा रे
तूच माझा भाव भोळा, मधुरसे गाणे परेशा

अभय कविता देखणी तू, वृत्त्त तू, स्वरशब्द तू रे
अंत्ययमका संग दे ते यमक तू माझे परेशा

                                         गंगाधर मुटे
............ **.............. **.............**.......
(वृत्त – मात्रावृत्त)

गगनांबरी तिरंगा ....!!






गगनावरी तिरंगा ....!!


गगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!!

तू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका
संगे हिमालयाला येण्यास मार हाका
समवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!!

साथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना
धारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना
कन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!!

तारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी
ही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी
आता अभय मनाच्या धुंदीस या जपावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!!

                                       गंगाधर मुटे
............ **.............. **.............**.......
(वृत्त : आनंदकंद)
..........................................................

मा. प्रमोद देव यांनी या गीताला अतिशय उत्तम चाल दिली.
ऐका तर.....

*     *     *

माय मराठीचे श्लोक...!!

माय मराठीचे श्लोक...!!
       
नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी!
तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी
जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

तुझे शब्दलालित्य सूरास मोही
तसा नादब्रह्मांस आनंद होई
सुरांच्या नभी सूरगंगा नहाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

जरी वेगळी बोलती बोलभाषा
अनेकांत एकत्व ही प्राणभाषा
असे भाग्य आम्हां मराठी मिळाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

असा मावळा गर्जला तो रणाला
तसा घोष "हर हर महादेव" झाला
मराठी तुतारी मराठी मशाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

अभय एक निश्चय मनासी करावा
ध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा 
सदा शब्द वाणीत ये सर्वकाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

                                   गंगाधर मुटे
............ **.............. **.............**.......
(वृत्त – भुजंगप्रयात)

बळीराजाचे ध्यान ....!!

बळीराजाचे ध्यान ....!!

सुंदर ते ध्यान उभे बांधावरी
नांगर खांद्यावरी घेवोनिया..॥१॥

कासे पितांबर ते फ़ाटके धोतर
टायरचे खेटर पायामधी..॥२॥

तुळशीहार जणू घामाचीच धार
उन्हाला आधार पगडीचा..॥३॥

कवच-कुंडले छातीच्या बरगड्या
पोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥

नैवेद्य-प्रसाद कांदा भाकरीचा
चेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥

आरतीला नाही त्याची रखुमाई
चारतसे गाई माळरानी..॥६॥

राजा शेतकरी बळीराज यावे
संघटित व्हावे अभयाने..॥७॥

                                   गंगाधर मुटे

............ **.............. **.............**.......

सजणीचे रूप ...!!

सजणीचे रूप ...!!

रुपये पाहता लोचनी। सुखी झाली ती साजणी ॥१॥
म्हणे व्यापारी बरवा। म्हणे पगारी बरवा ॥२॥
शेती बागा त्याचे घरी। परी नको शेतकरी ॥३॥
ऐसे सजणीचे रूप। पदोपदी दिसे खूप ॥४॥
अभय म्हणे कास्तकारा। डोहामधी डुबक्या मारा ॥५॥

                                            गंगाधर मुटे

............ **.............. **.............**.......

हताश औदुंबर

हताश औदुंबर


ऐल तीरावर लाल शिरावर,लुकलुकता घेऊन
निळा पांढरा थवा चालला, रजःकण पांघरून
ढोलं-चौघडे, बोल बडबडे, खाकी गर्दी पुढे
सरावल्यांची पोपटपंची, गगन भेदुनी उडे

पैल तीरावर पत्र घरावर, तुळशीचे ठेवून
बेत शिजविला,देह निजविला, काळघुटी घेऊन
अभागीनीचे कुंकूम पुसता, अचेतन ती पडे
पोशिंद्याचा बाळ भुकेला, तिच्या उराशी दडे

दोन तीरांना अभये धारा, विलगे निरंतर
पाने गाळुनी मुंडण करितो, हताश औदुंबर

                                          गंगाधर मुटे
............ **.............. **.............**.......
("त्या" सर्व हजारो स्वर्गिय शेतकर्‍यांना
भावपुर्ण श्रद्दांजलीसह सादर समर्पित.)

.....................................................

.आईचं छप्पर.

.आईचं छप्पर.


कडाक्यात भांडतात
मेघ गडगड करून
भरून येते नभाला
अश्रू ढाळते वरूण ...!


अश्रू बनती गारा
वादळ तांडव करी
गारठल्या हवेसवे
विजेस हिंव भरी ...!


हिंव भरल्या विजेस
ताप चढवी गारा
तिला पांघराया
छप्पर नेतो वारा ...!


छप्पर उडल्या संसारात
ब्रह्मपुत्रा वाहते
तेल मिरची शिदकुट
पाण्यावरती पोहते ....!


पोहतांना पुस्तक वही
सरस्वती भिजते
माती करून जीवाची
चूल उल्हे निजते ....!


गरजत्या पावसात
चोळी झबले न्हाती
पदराखाली लेकरं
कवटाळती छाती ....!


                      गंगाधर मुटे
............ **.............. **.............**.......

( शिदकूट = मोजक्या काळासाठी पुरेल एवढी अन्नसामग्री)
( उल्हा = एकप्रकारची कच्च्या मातीची चुलच पण लाकडा ऐवजी कोळशाचा जाळ घालतात.उल्हाचूल.)

औंदाचा पाऊस

     औंदाचा पाऊस 

सायबीन झालं पोटलोड, पराटी केविलवाणी
कोमात गेलं शिवार सारं, व्वा रे पाऊसपाणी ......!!


उन्हाळवाही-जांभूळवाही, शेती केली सुधारीत
बी-बेनं खत-दवाई, बीटी आणली उधारीत
नवं ज्ञान, नवं तंत्र, उदीम केला पुरा
पावसाच्या उघाडीनं, स्वप्न झालं चुरा
खंगून गेली कपाशी, बोंड बोरावाणी ......!!


बेनारचा बाबू म्हणे कापूस नाही बरा
औंदा पेर सायबीन, बरकत येईन घरा
नाही उतारा तिलेबी, खासर उलार होते
रोग झाला गेरवा,एकरी दीड पोते
बिनपाणी हजामत, चीत चारखानी ......!!


सायबाचं दप्तर म्हणते, पीक सोळा आणे
अक्कल नाही तूले म्हून, भरले नाही दाणे
विहिरीत नाही पाझर, नयनी मात्र झरे
किसाना परीस कईपट, चिमण्या-पाखरं बरे
भकास झालं गावकूस, दिशा वंगळवाणी .....!!


                      गंगाधर मुटे
............ **.............. **.............**.......
ढोबळमानाने शब्दार्थ :
पोटलोड = जमिनीतील अपुऱ्या ओलाव्यामुळे
दाण्याची पूर्ण वाढ होण्यापूर्वीच शेंग पक्व होणे.
पराटी = पऱ्हांटी,कपाशीचे झाड.
बेनार = कृषी विषयक सल्ला देणारा शासकीय विभाग
खासर = बंडी, शेतीमाल वाहतुकीसाठी बैल
जुंपून वापरावयाचे साधन.
गेरवा = तांबेरा नावाचा रोग, झाडाची पूर्ण वाढ न
होता पिक कापणीला येते.
खासर उलार होणे = लाक्षणिक अर्थाने व्यवस्था
कोलमडणे. घडी विस्कटणे
.....................................................