29 Aug 2010

सरबत...... प्रेमाच्या नात्याचं

सरबत...... प्रेमाच्या नात्याचं

मी तिला विचारलं
कसं असावं तुझं-माझं नातं....?
भ्रमर आणि फ़ुलासारखं...?
ती उत्तरली, "नको नको
एकदा मकरंद सेवून भ्रमर गेला की
परतण्याची शक्यता धूसर होते
तसा विरह मला नाही रे सहन व्हायचा"

मग मी तिला विचारलं
कसं असावं तुझं-माझं नातं....?
पतंग आणि पणतीसारखं...?
ती उत्तरली, "नको नको
भावनेच्या उत्तुंग अविष्कारात
पतंगाची आहुती जाण्याचा धोका
मी नाही रे पत्करायची"

मग मी पुन्हा तिला विचारलं
कसं असावं तुझं-माझं नातं....?
गीत आणि संगीतासारखं...?
की शब्द आणि स्वरासारखं...?
ती जरा संथपणे उत्तरली
"हे चाललं असतं..... पण
गीत आणि संगीत एकरूप होऊनही
आपापलं अस्तित्व
स्वतंत्रपणे टिकवून ठेवतात रे
मग तसं नातं का स्वीकारावं?"

मग तीच मला म्हणाली
"पण काय रे, तुझं-माझं नातं काव्यात्मक
साहित्यिक दर्जाचं वगैरे कशाला हवंय रे?
अरे ’’तू आणि मी”, ’’मी आणि तू”
"मी-तू", "तू-मी" कशाला हवंय रे?
त्याऐवजी "आपण" नाही का रे चालणार?
लिंबू आणि साखरेचं पाण्यातील मीलनासारखं...!
एकदा का त्यांचं मीलन झालं की
लिंबू आणि साखरेला स्वतंत्र अस्तित्वच उरत नाही
उरतेय केवळ .... आणि केवळ "सरबत"
लिंबू-साखरेला कधीही वेगवेगळं
न करता येण्यासारखं...!!
मला हवंय, तुझं-माझं नातं.... तस्सच
अगदी त्या ........... सरबतासारखं.......!!!"

                                                     गंगाधर मुटे
............ **.............. **............. **..............**........

No comments:

Post a Comment