29 Aug 2010

गोचिडांची मौजमस्ती

गोचिडांची मौजमस्ती

चौखूर उधळे दाहीदिशा, गवसणी मग घालणार कशी?
नसते नाकही या मनाला, वेसण तरी टोचणार कशी?

खूप करती निश्चय-इरादे, मुक्त होण्यास जोखडातुनी
चूल-तव्याने बंधक केले, कंबर आता कसणार कशी?

जग बदलले, नाणे बदलले, बदलले ते सारे शिरस्ते
नाणी रुप्याची राणीछाप, पण ती इथे चालणार कशी?

उकर तू तुला हवे तेवढे, हव्या तितक्या लाथाही घाल
पण तुझ्या एकट्या हाताने, जरठ गढी ढासळणार कशी?

रक्तापेक्षा गोचीड जास्त, झालेत तिच्या अंगोअंगी
गोचिडांची मौजमस्ती पण, अता ती गाय जगणार कशी?

’अभय’ तू असाच चालत रहा, रस्ता मिळेल कधी ना कधी
चालल्याविना खाचाखोचा, आडवाट ती कळणार कशी?

                                                       गंगाधर मुटे
....................................................................
(वृत्त - मात्रावृत्त )
....................................................................

No comments:

Post a Comment